पुणे : दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी नालासोपारा पालघर येथून बेड्या ठोकल्या. मोहमद रईस अब्दुल आहद शेख (३७, रा. मालवणी, मुंबई), मोहमद रिजवान हनीफ शेख (३३, रा. जोगेश्वरी, पूर्व मुंबई), अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल, गुन्ह्यात वापरलेले साहित्य, असा २० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघे घरफोड्यांसाठी मुंबई-पुणे असा कॅबने प्रवास करत होते.
२३ मार्च रोजी सकाळनगर बाणेर परिसरात भरदिवसा दोन ठिकणी घरफोडी झाली होती. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना ही घरफोडी मुंबई परिसरात राहणाऱ्या चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांना नालासोपारा पालघर येथून बेड्या ठोकल्या. दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रूपेश चाळके, अंमलदार सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबूलाल तांदळे, किशोर दुशिंग, मारुती केंद्रे, श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदीप दुर्गे आणि बाबा दांडगे यांच्या पथकाने केली.
मुंबई-पुणे कॅब प्रवास
पुण्यात घरफोड्या करण्यासाठी येत असताना, आरोपी कॅबने मुंबई ते पुणे असा प्रवास करत होते. घरफोड्या केल्यानंतर पुणे स्टेशन येथून ते मुंबईला पळून जात होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. मोहमद रईस हा सराईत चोरटा असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत तब्बल ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मोहमद रिजवान याच्यावर सहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
एरिया का पता भूल गये हैं जरा बताना..
भरदिवसा घरफोड्या करण्यासाठी दोघे चोरटे एक फंडा वापरत होते. पुण्यात दाखल झाल्यानंतर ते रिक्षा भाड्याने घेत होते. रिक्षात बसल्यानंतर हम एरिया का पता भूल गये हैं, हमे जरा बता देना, असे म्हणून मराठी परिसर असलेल्या सोसायट्यांची दोघे माहिती घेत असत. प्रामुख्याने ते रिक्षावाल्याला चार मजली जुन्या इमारती कोठे आहेत? हे काढून घेत. त्यानंतर त्या परिसरात जाऊन दिवसा बंद घरे हेरायचे आणि मग डल्ला मारायचे. मात्र, चतुःश्रृंगी परिसरातील घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले.