पाटेठाण : राहूबेट परिसरात सध्या भीमा व मुळा-मुठा नदीवरील कृषी विद्युत मोटारींच्या केबल, विद्युतपंप चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्री-अपरात्री गस्त घालूनदेखील हातावर तुरी देत चोर पोबारा करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. राहूबेट परिसरातील शेती पूर्णपणे भीमा व मुळा-मुठा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषी विद्युत मोटारी आहेत. मागील आठवड्यात चोरट्यांनी राहू, पिलाणवाडी, दहिटणे, टाकळी भीमा, पाटेठाण, वाळकी येथील कृषी विद्युत पंपाच्या तांब्याच्या तारा, मोटारी, कटआऊट विद्युतप्रवाह चालू अवस्थेत असतानादेखील चोरून नेल्याची घटना घडली. त्यानंतर स्थानिक लोकांनी रात्रीच्या सुमारास गस्त घालण्यास सुरुवात केली. परंतु त्याच दिवशी चोरट्यांनी तांबखडा येथील मोटारीच्या केबल लंपास केल्याची घटना घडली. परिणामी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
केबल, तांब्याच्या तारा चोरीच्या प्रमाणात वाढ
By admin | Published: February 16, 2017 2:58 AM