पिंपरी : केबल ‘वॉर’मध्ये पूर्वी केबल व्यावसायिकांमध्ये आपापसातच वाद होत होते. आता डिशमुळे केबल व्यावसायिक विरुद्ध डिश वितरक यांच्यात खटके उडू लागले आहेत. डिश टीव्हीमुळे केबल व्यावसायिकांचे वर्षानुवर्षांचे ग्राहक तुटू लागल्याने डिश विक्रेते, तसेच डिश बसविणारे कर्मचारी यांना केबल व्यावसायिक त्रास देऊ लागले आहेत. ग्राहकाला डिश विक्री केली म्हणून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रकाश हजारे या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारास मारहाण केली. या प्रकरणी मोहननगर पोलिसांकडे मंगळवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. केबल व्यावसायिकाचा हात असल्याची चर्चा आहे. मोहननगर येथे राहणाऱ्या हजारे या दुकानदारास दुचाकी आणि चारचाकी वाहनातून आलेल्या सहा जणांनी मारहाण केली. पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डिश टीव्ही विक्री करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. ग्राहकांना डिश बसविण्यास विरोध केला जातो. तसेच दुकानदारांनीही डिश विक्री करू नये, अशी दमबाजी करण्याच्या घटना घडल्या आहेत. मोहननगरमधील ही ताजी घटना असली, तरी यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना वाकड आणि चिंचवड परिसरात घडल्या आहेत. हजारे यांना मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविण्यास जात असताना तक्रार करू नये, यासाठी दमदाटी करण्यात आली. डिश घ्यायची की, केबल हे ठरविण्याचा अधिकार ग्राहकाचा आहे. परंतु ग्राहकाला त्याच्या मर्जीनुसार हे ठरविता येत नाही. ग्राहकाने केबल घ्यावी,असा त्या त्या भागातील केबल व्यावसायिकांचा आग्रह असतो. मोहनगनर भागात गेल्या काही दिवसांपासून कोणीही कामगार ग्राहकाच्या घरी जाऊन डिश बसवून देण्यास तयार होत नाही. डिशसाठी पैसे मोजले, तरी डिश लावणार कोण, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. डिशसाठी दोनशे रुपये मिळतील, परंतु केबलवाल्यांचा मार खावा लागेल, या भीतीने डिश लावण्यासाठी जाण्यास तयार होत नाही. ग्राहकांनी डिश घेण्याची इच्छा व्यक्त केली, तरी दुकानदारांनाही डिश बसविण्यास अडचणी येत आहेत.(प्रतिनिधी) डिश टीव्ही की केबल हा ग्राहकाचा अधिकार आहे. त्यांना अमूकच वस्तू घ्यावी वा घेऊ नये अशी सक्ती करता येणार नाही. डिश बसविण्यास केबलवाल्यांनी विरोध करणे गैर आहे. केबलच घ्यावी, अशी सक्तीसुद्धा चुकीची आहे. त्यांना पोलिसांकडे, तसेच ग्राहक मंचातही दाद मागता येईल. - रमेश सरदेसाई, अध्यक्ष,ग्राहक पंचायत पिंपरी चिंचवड
केबलवाल्यांचे धतिंग
By admin | Published: February 05, 2015 12:35 AM