लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम ३ करंडक आंतर क्लब २३ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत ब गटात हर्षल काटे (नाबाद 97)च्या फलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमीने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा ६३ धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, पवन शहा (१०२ धावा)च्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पाच गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदविला.
पीवायसी हिंदू जिमखाना व नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात काल डेक्कन जिमखाना संघावर एका धावेने थरारक विजय मिळविणाऱ्या केडन्स क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवली. पहिल्यांदा खेळताना केडन्स संघाने ४५ षटकात ४ बाद ३०१ धावाचे आव्हान उभे केले. यात अजिंक्य गायकवाड व प्रद्युम्न चव्हाण या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ११५ चेंडूत १०६ धावांची भागीदारी करून संघाचा पाया भक्कम केला. त्यानंतर हर्षल काटे याने अफलातून फटकेबाजी करत ४६ चेंडूत १५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९७ धावा आणि अथर्व काळेने ४४ धावा करून संघाला ३०१ धावाचे लक्ष्य उभे करून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव ४१.१ षटकात २३८ धावावर संपुष्टात आला. सामनावीर हर्षल काटे ठरला.
नेहरू स्टेडियम मैदानावरील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव ४४.१ षटकात २०९ धावावर संपुष्टात आला. यात यश क्षीरसागर व राजवर्धन उंडरे या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १४७ चेंडूत ११२ धावांची भागीदारी केली. व्हेरॉककडून रोहित चौधरी (३-४०), कपिल गायकवाड (२-४६), मनोज यादव (१-२५), राहुल वारे (१-४१) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला २०९ धावांवर रोखले. हे आव्हान व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने ३९.२ षटकात ५ बाद २११ धावा करून पूर्ण केले. यात पवन शहाने १११ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी केली. पवन शहा सामन्याचा मानकरी ठरला.