ओझर येथील मांडे मळ्यात विलास सोनू कवडे यांच्या उसाच्या शेतात आज गुरुवारी सकाळी ऊसतोड चालू होती. यावेळी बिबट्याचे दोन बछडे ऊसतोड करणाऱ्या कामगारांना आढळून आले होते.
दिवसभर असलेल्या तीव्र उन्हामुळे या बछड्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल करून डॉ. निखिल बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
वनविभाग व माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील टीमने या बछड्यांवर उपचार केले. उसाच्या शेतात ज्या ठिकाणी हे बछडे सापडले होते पुन्हा त्याच ठिकाणी या बछड्यांना एका कॅरेटमध्ये ठेवले होते. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील डॉ. निखिल बनगर, डॉ. महेंद्र ढोरे, सहायक आकाश डोळस, वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे, वनरक्षक कल्याणी पोटवडे यांनी ही कामगिरी पार पाडली.
उसाच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवल्यानंतर बछड्यांना पाहण्यासाठी त्यांची आई सायंकाळी कॅरेट जवळ आली होती. मात्र त्यावेळी उजेड असल्याने कॅरेटमधील बछडे पाहून ती जवळच दबा धरून बसली होती. अंधार पडल्यानंतर रात्री ९च्या सुमारास ती बछड्यांना कॅरेटमधून घेऊन गेली.
पहिल्या छायाचित्रात ओझर येथील उसाच्या शेतात एका कॅरेटमध्ये बछडे ठेवताना वनाधिकारी व रेस्क्यू टीमचे पदाधिकारी तर दुसऱ्या छायाचित्रात रात्री ९.३०च्या सुमारास बछड्यांची आई बछड्यांना कॅरेटमधून घेऊन जाताना.