शेलपिंपळगाव : संगमवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले तर एक वासरू जखमी झाले. शुक्रवारी (दि.३०) पहाटे बिबट्याने दोन लहान पाळीव प्राण्यांवर हल्ला केला. या घटनेमुळे संगमवाडीसह आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मानवी वस्तीत बिबट्यांचे वाढलेले वास्तव दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागले आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहुळ, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, रामनगर, मरकळ, गोलेगाव-पिंपळगाव, कोयाळी-भानोबाची, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, चिंचोशी, मोहितेवाडी आदी गावांमध्ये नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. त्यातच संगमवाडी परिसरात शिकारीच्या शोधार्थ बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे.
शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास संगमवाडी येथील बबन नारायण दौंडकर यांच्या गाईच्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला करून एकास ठार केले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक वासरू बिबट्याच्या तावडीतून सुटले. परंतु ते जखमी झाले. दौंडकरवाडी येथील ज्ञानेश्वर सर्जेराव दौंडकर यांच्या मालकीच्या दोन पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यास फस्त केले. दरम्यान, घडलेल्या घटनेची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभाग प्रशासनाला माहिती दिली आहे.
संगमवाडी परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविण्याची मागणी भाऊसाहेब दौंडकर, चेअरमन सतीश गुजर, ग्रामपंचायत सदस्य नितीन दौंडकर, सर्जेराव पोतले, साहेबराव कराळे, नवनाथ दौंडकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, सुभाष पवळे, जालिंदर दौंडकर, वासुदेव दौंडकर आदींनी केली आहे.