पुणे : ड्रग्स ट्रॅफिकिंगसाठी तुमचा सोशल सिक्युरिटी नंबरचा वापर झाला असल्याची भिती दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणुक करणारे कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उद्धवस्त केले आहे़. यामधील दोघांना अटक केली आहे़.कॅम्पमधील प्लेस ऑफ वर्कशिप बिल्डिंगमध्ये किंगस्टन मिडिया या नावाने हे कॉल सेंटर चालविले जात होते़. या कॉल सेंटरमधून हजारो अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे़. आकीब अल्ताफ शेख (वय २७, रा़ साईबाबा नगर, कोंढवा) आणि सारीम अमान शेख (वय २९, रा़ भिमपुरा गल्ली, कॅम्प) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ या ठिकाणी त्यांनी ८ जणांना कामाला ठेवले होते़. या कॉल सेंटरमधून ३ मोबाईल, १० संगणक हार्ड डिस्क, ३ राऊटर, ८ हेडफोन, १ पेनड्राईव्ह, स्क्रिनशॉटचे ३० पाने असा माल हस्तगत केला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॅम्पमधील या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना बनावट नाव धारण करुन ते सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्टेशन विभागातून बोलत असल्याचे सांगत. त्यांच्या सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्टेशन नंबरवरुन अनयुज्वल अॅक्टिव्हिटी करण्यात येत असल्याची भिती दाखवत़ व अमेरिकन नागरिकांना त्यांचे नाव, पत्ता व सोशल सिक्युरिटी नंबर विचारतात. त्यानंतर तपासणी केल्याचे दर्शवून त्यांचा सोशल सिक्युरिटी नंबरचा वापर ड्रग्स ट्रॅफिकिंगसाठी झाला आहे, असे सांगून सेटलमेंटसाठी युएसए ट्रेझरी विभागाशी संपर्क करा असे सांगतात. त्यानंतर कॉल फिसमधील दुसऱ्या क्रमांकावर तो कॉल फॉरवर्ड करुन ते युएसए ट्रेझरी विभागामधून बोलत असल्याचे सांगत़ अमेरिकन नागरिकांना कारवाईची भिती दाखवून अमेरिकन नागरिक सेटलमेंटसाठी तयार झाल्यावर त्यांना २०० ते ५०० डॉलरचे वॉलमार्ट गिफ्टकार्ड, ईबे गिफ्टकार्ड, टारगेट गिफ्टकार्ड, बेस्टबाय गिफ्टकार्ड यांची खरेदी करायला सांगत़. त्यांच्याकडून त्या गिफ्ट कार्डचा नंबर घेऊन त्या कार्डाचे पैश्यात रुपांतर करुन घेऊन अमेरिकन नागरिकांची फसवणुक करीत असल्याचे उघड झाले आहे़. याबाबत अमेरिकेतून तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी कॅम्पमधील या कॉल सेंटरवर छापा घातला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर धावटे, हवालदार अस्लम अत्तार, पोलीस नाईक अजित कुऱ्हे , योगेश वाव्हळ, संतोष जाधव, प्रसाद पोतदार, प्रविणसिंग राजपूत, ज्योती दिवाणे यांनी केली आहे़.
हजारो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे कॉल सेंटर उद्धवस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 4:01 PM
कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना बनावट नाव धारण करुन ते सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्टेशन विभागातून बोलत असल्याचे सांगत...
ठळक मुद्दे सायबर पोलिसांनी कारवाई : दोघांना अटक