बारामती (पुणे) : जालना येथे सनदशीर मार्गाने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानष लाठीमारानंतर बारामतीत मराठा समाज आक्रमक झाला आहे.लाठीमाराच्या घटनेचा शनिवारी(दि २) समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. सरकारचा निषेध करत सोमवारी बारामती बंद ठेऊन मूक मोर्चा काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लाठीमारचा आदेश देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी व लाठीहल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती यांच्या वतीने यावेळी करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाज, अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू राष्ट्र सेना, शिवजयंती महोत्सव समिती, मराठा सेवा संघ व इतर संघटना यांच्या वतीने नायब तहसीलदार भाऊसाहेब करे व शहर पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला, पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, सरकारने मराठा समाजाला गृहीत धरू नये. यापूर्वी झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता असताना उपोषणकर्त्यांवर झालेला हल्ला या मागील गौड बंगाल काय आहे, याची सखोल तपास व्हावा. या घटनेचा निषेध करताना मराठा समाज जर रस्त्यावर उतरला तर प्रशासनाला पळता भुई थोडी होईल, मराठा समाजाच्या संयमाचा अंत बघू नये अशा संतप्त प्रतिक्रिया विविध पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या.