कर्जाचा वाढता बोजा कसा सावरणार? विशेष पॅकेज मिळण्याची मागणी.
ओतूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचे व पर्यायाने त्यांचे व्यवसायाचेदेखील जीव घेतले, १५ मेपासून सुरू झालेला दुसऱ्या लाटेतील हा तिसरा लॉकडाऊन खऱ्या अर्थाने अर्थचक्र थांबविणारा व छोटे व्यवसाय संपुष्टात आणणारा ठरला. या काळात असंख्य छोटे दुकानदार बाधित झाल्याने अद्यापही विविध रुग्णालयांतून उपचार घेत आहेत. उपचाराकामी जवळची होती नव्हती तेवढी पुंजीही संपल्याने व लॉकडाऊनमुळे आधीच दुकानदारी बंद असल्यामुळे हा छोटा व्यावसायिक पूर्णपणे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाडेतत्त्वावरील जागेत विविध बँकेचे व पतसंस्थांची कर्जे काढून थाटलेले व्यवसाय बंदच असल्याने मासिक जागाभाडे भरणेही या व्यावसायिकांना दुरापास्त झाले आहे. असे ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे. येत्या काही दिवसांत राज्य शासनाचे निर्बंध शिथिल केले जातील. मात्र या छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा कसे सावरायचे व कसे उभे राहायचे हा मोठा जटिल प्रश्न ग्रामीण भागात बनून राहिला आहे.
अगोदरच्या कर्जाचे थकीत हप्ते व आधीच कर्जाच्या खाईत लोटलेला व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, या विवंचनेत हे व्यावसायिक आहेत.
हॉटेल, चहा विक्रेते,चप्पल विक्रेते, टेलरिंग व्यवसाय,केश कर्तनालय,जनरल स्टोअर्स,बांगडी,स्टेशनरी, क्रोकरी साहित्य,कापड विक्रेते,प्लास्टिक विक्रेते,मोबाईल शॉपी व असे छोटे व्यापारी आणि इतर समाज घटकांना कोरोना निर्बंध लादल्याचा फटका बसला आहे.अशा सर्व व्यावसायिकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी शासनस्तरावर प्राधान्याने प्रयत्न होऊन त्यांना विशेष आर्थिक मदत मिळण्याची व वीजबिले माफ करण्याची मागणी गावोगाव सर्वत्र जोर धरू लागली आहे.
छोटे व्यावसायिक लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद.