बारामती: गावात असणाऱ्या समाधीच्या उत्सुकतेपोटी गोजुबावी (ता. बारामती) येथील वकिलाने संकलित केलेल्या माहितीमधून बारामतीचा इतिहास उलगडला आहे. ॲड. काकासाहेब आटोळे असे या वकिलाचे नाव आहे. ते समशेर बहाद्दर संताजी आटोळे यांचे वंशज आहेत.
ॲड. आटोळे यांनी गावात असलेल्या समाधी मंदिराच्या उत्सुकतेमधून पेशवे दफ्तर पुरालेखाकार कार्यालयात माहिती अधिकारात माहिती मागविली होती. यामध्ये ॲड. आटोळे यांनी मिळालेली माहिती, इतिहास परिसरात माहिती होण्यासाठी ‘शेअर’ केला.
छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांनी दिलेल्या इनामाचे नक्कलपत्राचा मराठी अनुवादामुळे, ‘वतनपत्र’नक्कलेमुळे माहिती मिळण्यास मदत झाल्याचे ॲड. आटोळे म्हणाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी स्वराजाचे पुरातन एकनिष्ठ सेवक असा उल्लेख केलेले सरदार समशेरबहाद्दर संताजी आटोळे यांचे गोजुबावी आणि कटफळ हे गाव आहे. तर बारामतीचा सरंजाम आणि मोकासा हा सुध्दा समशेर बहाद्दर संताजींकडे होता असा उल्लेख आढळत आहे. परंतु नंतर पेशव्यांनी बारामतीचा सरंजाम हा बाबूजी नाईकाकडे दिल्याचा उल्लेख आढळतो. परंतु मोकासा वसूल करण्याचा हक्क मात्र कायम ठेवला आहे, असे समशेर बहाद्दर संताजी आटोळेचा पणतू आहिलोजी आटोळे यांनी १ ऑगस्ट १८५४ साली दिलेल्या कैफियतीवरून जाणवते, असे ॲड. आटोळे यांनी सांगितले.
संताजी आटोळे यांनी मोगलाई ईलाख्यात अनेक स्वाऱ्या करून मोघलाईचा अनेक प्रदेश स्वराजाला जोडला होता. त्यामुळे संताजीस बालाघाटची जाहगिरी दिली होती, असे इतिहासात अवगत होते. त्यामुळे संताजी आटोळे आणि नागपूरचे रघुजी भोसलेंशी खूप चांगले स्नेहसंबंध होते. त्यामुळेच संताजींचा पणतू आहिलोजीचा जन्मसुध्दा ‘रघोजी भोसल्यांच्या’ घरी झाल्याचा उल्लेख आहिलोची त्यांच्या कैफियतीत करतात. समशेर बहाद्दर पानिपत युध्दात कामी आले असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो.
ही कैफियत ही बाबूजी नाईकांचे भाऊ आणि सरंजामदार लक्ष्मण सदाशिव नाईक यांच्या विरूध्द ‘मोकासा’ बाबत वाद झाल्याचा उल्लेखही आहिलोजी आटोळे त्यांच्या कैफियतीत करतात. तसे पत्रही इंग्रज इनाम कमिशनर रॉबर्टसन यांना लिहिलेल्या पत्रात सापडतो. इनामाच्या कैफियतीत दाखल केलेल्या पुराव्यात एक पर्शियन भाषेत असलेले पत्र सापडते. परंतु त्या पत्राचे वाचन अजून बाकी आहे. मोकासा वसूल करण्याच्या अधिकारावरून मोकाशी ही आडनाव पडले. परंतु मोकाशी कुटुंबीयाचे मूळ आडनावे आटोळे आहे, हेही आधोरेखित होते. तसेच गोजुबावीचा इतिहास आटोळे वंशातील वीर पत्नी गोजाबाई ही सती गेल्यामुळे गावाचे नाव गोजुबावी पडले. (बावी या शब्दाला समानार्थी शब्द बाई असाच सापडतो),अशा प्रकारच्या ऐकिव इतिहासाला बळकटी मिळते.या सर्व मोडी कागदपत्रांचे वाचन शासनमान्य मोडी अभ्यासक संदीप बेंद्रे यांनी केले, असल्याचे ॲड. आटोळे यांनी सांगितले.
...मोकासा म्हणजे काय
सरंंजामी सरदारांच्या पदरी असलेल्या तैनात सैन्याच्या खर्चाचा मोबदला म्हणून नगद अथवा रोखीने पैसे न देता तेवढ्या करवसुली उत्पन्नाचा मुलूख तोडून दिला जात असे. त्या प्रदेशाला मुकासा आणि ज्या सरदाराला तो मोकासा प्रदेश दिला जात असे, त्यास मुकासदार किंवा, मोकासदार ही संज्ञा होती, असे ॲड. काकासाहेब आटोळे यांनी मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.