पुणे: ते मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे, पुण्यात येऊन रंगकाम करण्यास सुरुवात केली. इमारतींच्या रंगाचे काम अंगावर घेऊन करताना त्यांना त्यात तोटा झाला. हा तोटा भरून काढायचा कसा, याचा विचार करत असतानाच चोरलेले मोबाइल विकले तर चांगले पैसे मिळतात, असे समजून ते लोकांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने चोरू लागले. हे मोबाइल विकण्याच्या प्रयत्न करीत असतानाच पोलिसांना सुगावा लागला अन् ते पोलिसांच्या तावडीत सापडले. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
राज अंगनुराम गौतम (वय २६, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ गाव जोनपूर, उत्तर प्रदेश) आणि विजय शिवमुरतराम कुमार (वय २०, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ गाव गाझीकूर, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ मोबाइल व एक दुचाकी असा २ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रेकाॅर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी त्यांना या चोरट्यांविषयी माहिती मिळाली होती. राम मोबाइल शॉपी दुकानासमोर दोघे जण दुचाकीवरून उतरून थांबले होते. त्यांच्यातील एकाच्या हातात छोटी पिशवी होती. पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीत १२ मोबाइल आढळून आले. त्याबाबत चौकशी केली असता, त्यांनी ते लोकांच्या हातातून जबरदस्तीने चोरून आणल्याचे सांगितले.
हिंजवडी आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील २, तर अलंकार, कोंढवा, चतु:श्रृंगी, वारजे माळवाडी या पोलीस ठाण्यातील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक गुंगा जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.