चाकण : परिसरात रस्त्यात उभ्या करण्यात येणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीसह, ट्रिपल सीट, विनापरवाना, बेफाम वाहने चालविणाऱ्या व शाळा, कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी गर्दीतून बेफाम वेगाने वाहने चालविणाऱ्या रोडरोमिओंवर व ४० दुचाकीस्वारांवर येथील माणिक चौकात चाकण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे, उपनिरीक्षक सुहास ठोंबरे, राकेश कदम, पोलीस हवालदार हरगुडे, जाधव, नऱ्हे, लांडे, भोजणे, साबळे, मुंडे, भापकर, कोल्हे यांच्या पथकाने जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर माणिक चौकात नाकाबंदी करून मुख्य रस्त्यावर बेफाम वाहने चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई सुरू केली होती. एकूण ४० दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजाराचा दंड पोलिसांनी वसूल केला. दुकानांसमोर बेशिस्तपणे वाहने पार्किंग वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या व भर रस्त्यावर उभ्या करण्यात येणारे वाहनचालकही या कारवाईतून सुटले नाही. चाकण पोलिसांनी मागील पंधरवड्यापासून सुमारे ४०० वाहनचालकांवर वाहतूक नियमानुसार कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम
By admin | Published: February 03, 2016 1:39 AM