लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव गणपती : कोरोनाची तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवायला हव्या. हॉटस्पॉट गावांमध्ये याबाबत तत्काळ कार्यवाही करून ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जावा. यासोबतच शिरूर तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे शिरूर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते. या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, माजी सभापती विश्वास कोहकडे, राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, प्रमोद पऱ्हाड, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, हेमंत शेडगे, प्रवीण खानापुरे उपस्थित होते.
सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्र कमी झाला असला तरी शिरूर तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट गावांमध्ये संसर्ग कमी झालेला नाही. या गावांमध्ये विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी देशमुख यांनी कोरोना हॉटस्पॉट व पुणे-नगर महामार्गावरील गावात सोमवार (दि ३१) पासून घरोघरी सर्वेक्षण करुन कोरोना संशयित रुग्णाची आरटीसीपीआर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश गृहमंत्री यांनी या वेळी दिले.
चौकट
रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पाबळ व मलठण येथे ऑक्सिजन बेड या आठवड्यात सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या ३९ गावांमधील कोविड सेंटर बंद करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पाचुंदकर यांनी बैठकीत व्यक्त केले.
फोटो:- पुणे येथे शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील कोरोना स्थितीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आढावा बैठक घेतली.