पुणे : दोन पक्षांची युती झाल्यावर ‘मनोमिलन’ हा परवलीचा शब्द बनतो. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळमध्ये सध्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. पुण्यामध्ये मात्र याची गरज पडली नाही. गिरीश बापट यांच्या प्रचारात भारतीय जनता पक्षापेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते अधिक दिसू लागले आहेत. मात्र, यामुळे विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते धास्तावले आहेत.
पुणे शहरात २०१४च्या निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या सहाही जागा जिंकल्या होत्या. या वेळी पुन्हा युती झाल्याने शहरातून किमान दोन जागा तरी शिवसेना मागणार. या जागा कोणत्या, याकडे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यावर याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी मिळाल्यावर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे अचानक सक्रिय झाले. सर्व ठिकाणी बापट यांच्यासोबत ते दिसत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे श्याम देशपांडे हेदेखील सक्रिय आहेत. यामुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांत मात्र संभ्रम आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या प्रकाश जावडेकर यांच्या सभेच्या वेळीही आले होते. २०१४ पूर्वी युतीच्या जागावाटपात कोथरूड मतदारसंघ शिवसेनेकडे होता.
शिवाजीनगर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निम्हण हे दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून गेले आहेत. २०१४मध्ये कॉँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१९ची तयारी सुरू केली. निम्हण यांना प्रचारात फिरवायचे तर विद्यमान आमदार विजय काळे नाराज होणार, अशी चर्चा आहे. युतीमध्ये शिवाजीनगर मतदारसंघही शिवसेनेकडे होता. पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ या मुंडे गटाच्या मानल्या जातात. विद्यमान खासदार अनिल शिरोळे हेदेखील मुंडे गटाचेच. त्यांना उमेदवारी नाकारल्याचे पडसाद या मतदारसंघात उमटण्याची भीती आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस आणि राष्टÑवादीचे कार्यकर्ते सचिन तावरे लढले होते.
वडगावशेरी मतदारसंघही पूर्वी शिवसेनेच्या वाट्याला होता. २०१४मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सर्वाधिक चुरशीची लढाई याच मतदारसंघात झाली होती. यामुळे शिवसेनेचा दावा आहे. मात्र, शिवसेनेच्या कायकर्त्यांना प्रचारात खूप स्थान देणे आमदार जगदीश मुळिक यांना परवडणार नाही. कसबा हा गिरीश बापट यांचा घरचा मतदारसंघ. येथूनच ते सलग पाच वेळा निवडणूक जिंकले. कसब्यातून विधानसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत आतापासूनच उत्सुकता आहे. इच्छुकांची वाढती संख्या भाजपपुढील डोकेदुखी आहे. बापट कोणाला किती स्थान देत आहेत, यावर सगळेच कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.ताकदीचा मुद्दा महत्त्वाचाच्कॅन्टोंमेंट मतदारसंघात राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार आहेत. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे येथील माजी आमदार आहेत. गेल्या वेळी बागवे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. येथील आपली ताकद टिकून आहे, हे दाखविण्यासाठी बागवे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.