पुणे : गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. जलसंधारणाच्या या श्रमदानात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. ग्रामविकासाच्या या कामात सहभागी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने विविध गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यापीठाच्या राष्टÑीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने सहभाग घेण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून ५० गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांमध्ये गावकऱ्यांसमवेत सामूहिक श्रमदानाच्या उपक्रमात महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.विद्यापीठ, महाविद्यालये केवळ शैक्षणिक कार्यापुरतीच सिमित न राहता त्यांनी विधायक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन लोकसहभाग व लोकप्रतिसादाची मोहीम साकार करण्याचा प्रयत्न याव्दारे करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्हयातील गावांमध्ये ७ दिवसीय जलसंधारण शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय राष्टÑीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तालुक्यतील गावांमध्ये तिथली जवळपासची महाविद्यालये सहभागी होणार आहेत. महाविद्यालयातील राष्टÑीय स्वयंसेवक योजनेतील१०० स्वयंसेवक, महाविद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतरर कर्मचारी, महाविद्यालय व संस्थांचे पदाधिकारी आणि लोकसहभागातून ही शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सप महाविद्यालयाच्यावतीने पुरंदर तालुक्यातील वाघापूर या गावामध्ये ५ मे ते ११ मे या कालावधीमध्ये राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळया महाविद्यालयातील २ विद्यार्थी व २ विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. यामध्ये श्रमदानावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर जलसंधारण, दुष्काळ, पाणलोट विकास, जैवविविधता, ग्रामीण विकास या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व गटचर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.
जलसंधारणासाठी श्रमदानाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:50 AM