राजू इनामदार
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात सर्वच पक्षांतील नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. राेजच्या जगण्यातील प्रश्नांवर मात्र काेणीच काही बाेलत नाही. त्यामुळे मतदार पुरते गोंधळात पडले आहेत. मातब्बर नेतेमंडळींची उपस्थिती पाहून आपल्या मतदारसंघात पोटनिवडणूक होते आहे की, सार्वत्रिक निवडणूक, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावरून नेते जाेमात, मतदार मात्र राेजच्या प्रश्नांना ताेंड देता देता काेमात गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य पक्ष यांची महाविकास आघाडी विरूद्ध भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे सहकारी पक्ष यांची महायुती अशी दुरंगी लढत येथे होत आहे. पोटनिवडणुकीत भली मोठी फौज उतरली जात असली, तरी त्यांच्या भाषण, पत्रकार परिषदा, मुलाखती, खासगी भेटी - गाठींमध्ये मतदारसंघातील प्रश्नावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही.
काेण काय म्हणाले?
विरोधातील उमेदवार निवडून येऊन करणार काय? त्याला विकासनिधी कोण देणार? - चंद्रकात पाटील, उच्चशिक्षण मंत्री
चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष झालात; पण त्यातील ५०० कोटी रुपयांचे केले काय? - मोहन जोशी, काॅंग्रेस नेते
वेळ देणारा नाही, कायदे समजणारा माणूस आमदार हवाय! - रवी चव्हाण, बांधकाम मंत्री
स्थायी समितीचे सदस्य अर्ध्या रात्री अध्यक्षांच्या घरी कशासाठी गेले होते? - नाना पटोले, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष
आम्हाला धोका दिला, त्याची शिक्षा आयोगाने दिली! - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
भाजपला हुकूमशाही आणायची आहे! - बाळासाहेब थोरात, माजी मंत्री
शिवसेनेच्या संपत्तीवर दावा करणार नाही. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मोदींनी देशात परिवर्तन आणले. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महायुती :उपमुख्यमंत्री मुक्कामी
भाजपने कसबा पाेटनिवडणुकीत अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रचार सभांबराेबरच केंद्रीय गृहमंत्र्यांचाही दौरा घडवून आणला. त्याशिवाय वेगवेगळे आजी-माजी मंत्री सातत्याने मतदारसंघात येतच आहेत. त्यांच्या जाहीर प्रचार सभा, खासगी बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री तर मतदारसंघात मुक्कामाला आहेत. जवळपास दररोज सकाळ, संध्याकाळ व रात्रीही फिरताना, बैठका घेत आहेत.
महाविकास आघाडी :विरोधी पक्षनेत्यांचा रोड शो
महाविकास आघाडीनेही माजी महसूल मंत्र्यांसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वेगवेगळ्या खात्यांचे माजी मंत्री यांच्याबरोबर विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनाही सक्रिय केले आहे. त्यांचेही काही आमदार ठाण मांडून आहेत. मतदारसंघातील प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी तर रोड शोही केला.
मतदार अन् मतदारसंघही वाऱ्यावर
एका पोटनिवडणुकीत भली मोठी फौज उतरली असली तरी मतदारसंघातील प्रश्नांवर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. या मतदारसंघात सलग ३० वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. तेही काय काम झाले, काय काम करणार यावर बोलायला तयार नाहीत. दुसरीकडे सलग ६ वेळा या मतदारसंघात काँग्रेसच्या पदरी पराभव आला. तेही विजय मिळाला तर काय करणार, हे सांगायला तयार नाहीत. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्यातच दोन्ही प्रमुख उमेदवारांचा प्रचार फिरतो आहे. ती कोंडी फोडावी, असे नेत्यांनाही वाटायला तयार नाही.
यावर भूमिका स्पष्ट करणार का?
- कसबा मतदारसंघात किमान १ हजार जुने वाडे आहेत. बांधकामासंदर्भातील नवीन नियम, कायदे विकसनात अडथळे ठरत आहेत. यावर धोरणात्मक निर्णय होण्याची आवश्यकता असतानाही काेणताच नेता, पक्ष त्यावर स्पष्टपणे बोलत नाही.- प्रार्थनास्थळे, अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे यामुळे मतदारसंघातील काही रस्ते नियमितपणे पूर्ण बंद करावे लागतात. स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना त्याचा कायमचा त्रास आहे. त्यावर कोणीच बोलत नाही.- नदीसुधार, समान पाणी योजना, नदीकाठ सुधार, ड्रेनेजच्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया, अशा अनेक योजना राज्य व केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने हाेणार असून, त्या आज राेजी अर्धवटच आहेत. हा विषयसुद्धा प्रचारात निघाला नाही.- वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईने वाहतुकीची कोंडी ही मतदारसंघात नित्याची बाब झाली आहे. सार्वजनिक वाहनतळ नसल्याने वाहने लावताना अडचण होते. यावर उपाय कोणीच सांगत नाही.- महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात फक्त महिलांसाठी म्हणून एकही सार्वजनिक प्रसाधनगृह किंवा त्यांच्यासाठीच म्हणून अशी एकही स्वतंत्र योजना नाही. हाही विषय पूर्ण दुर्लक्षित राहिला आहे.