वेळेचे नियोजन - लहान मुलं म्हटलं की अभ्यास केव्हा आणि कोणत्यावेळी करावा, असा प्रश्न पालकांना सतत भेडसावत असतो. काहींना सकाळी अभ्यास करणे आवडते, तर काहींना दुपारी किंवा रात्री झोपण्याच्या आधी. अभ्यासाची प्रत्येकाची सवय ही वेगवेगळी असते. पालकांनी मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक करावे. वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासाची मर्यादा ठरविल्यास मुलांच्या मनावर होणारा ताण कमी होईल. मुलांच्या अभ्यासाची वेळ अशी असावी जेणेकरून त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, कार्टुन इतर मनोरंजनाच्या गोष्टी आठवणार नाहीत. शिवाय, घरात सर्वत शांतता असेल तर अभ्यासात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येणार नाही. अभ्यास कधी करायचा हे पूर्णत: त्या मुलावर आणि त्यांच्या पालकांवर अवलंबून असते. त्यामुळे दिवसातील थोडा वेळ का होईना मनापासून अभ्यास करावा म्हणजे मुलांच्या व्यवस्थित लक्षात राहील.
नियमितपणा - जसे आपण आपल्या कामाचे नियोजन आखतो, तसेच नियोजन मुलांच्या अभ्यासाचे हवे. मुलांना कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा अभ्यास करावा याचे वेळापत्रक करून ठेवावे. त्यामुळे त्यांना रोजचा थोडा वेळ अभ्यास करण्याची सवय लागेल. मुलांनी नियमितपणे अभ्यास केल्यास ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचा गोंधळ होणार नाही.
नीटनेटकेपणा- मुलांच्या अभ्यासाची नेहमीची जागा ही स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. अभ्यास करत असलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचा पसारा नसावा. म्हणजे अभ्यास करताना मुलांना फ्रेश वाटेल अभ्यासही चांगला होईल. मुलांना रोजच्या ५ ओळी लिखाणाची सवय लावावी म्हणजे अक्षर सुंदर, स्वच्छ होईल आणि अक्षरात नीटनेटकेपणा देखील येईल.
अभ्यासातील वेगवेगळ्या कृती अभ्यास करत असताना त्यात वेगवेगळ्या कृती करणे गरजेचे आहे. जसे वाचन, - लिखाण, पाठांतर इ. म्हणजेच वाचन झाले की थोडावेळ लिखाण मग पुन्हा वाचन. अशा कृतीमुळे मुलांना कंटाळा येणार नाही. वाचन झाल्यावर तो मुद्दा लिहून काढावा म्हणजे तो मुद्दा लक्षात राहण्यास मदत होते. रोजच्या रोज वाचन आणि त्या संबंधीतले लिखाण मुलांच्या उपयोगाचे ठरेल.