पुणे : जिल्हा परिषदेच्याच एका कर्मचाऱ्याने एका सेंटरवर जाऊन प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवरून छायाचित्र काढल्याने शिपाईपदाची परीक्षाच रद्द करण्यात आली होती. ती परीक्षा आता ३ जानेवारी रोजी पुन्हा नव्याने होणार आहे.जिल्हा परिषदेत कर्मचारी भरतीसाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. १८५ जागांसाठी ३८ हजार ३०४ अर्ज आले होते. बाकी सर्व पदांसाठी परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र, शिपाईपदाची परीक्षा सुरू असताना जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहायक क्षितिज डोंगरे केंद्रावर आले व त्यांनी एका वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेचा फोटो आपल्या मोबाईलवरून काढला. याला उमेदवारांनी आक्षेप घेतला. येथे मोठा गोंधळ उडाला. यानंतर संशय निर्माण झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, फौजदारी करण्यात आली आहे. या पदासाठी ४० जागांसाठी १६ हजार ९९० अर्ज आले होते. या सर्वांची आता ३ जानेवारी रोजी नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे. सामान्य प्रशासनाने या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना संपर्क साधून कळविले आहे. (वार्ताहर)
शिपाईपदाची परीक्षा आता ३ जानेवारीला
By admin | Published: December 17, 2015 2:09 AM