पुणे : राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलय. ते म्हणाले, 'भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. माझ्या आणि त्यांच्या युतीची चर्चा सुरु नाहीये. युती करायची असल्यास मला केंद्राशी बोलावं लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.'
पुण्यात कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य पाठवणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पक्ष कार्यालयात ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. 'तसेच युती करण्यासाठी मला आमचे पक्ष कार्यकर्ते, सहकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागेल. सद्यस्थितीत माझे सर्वच गैरसमज दूर झाल्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांचा होकार असेल. तर भविष्यात युती होऊ शकते असेही ते म्हणाले आहेत.'
राज ठाकरे यांची भूमिका
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली असताना त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही.
मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले होते.