पुणे : मराठी चित्रपट सृष्टीने मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी सारखा विचार करायला हवा आहे. कमीत कमी रुपयांत रसिकांना चित्रपट आपण रसिकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत तर पायरसी थांबवता येईल असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने मराठी चित्रपट निर्मात्यांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच पुण्यात करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ वात्रटिकाकार व दिग्दर्शक रामदास फुटाणे, सतीश रणदिवे, मेघराजराजे भोसले, अभिनेते मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर, संजय ठुबे, अण्णा देशपांडे, संचालिका निकिता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर तसेच २०० हून जास्त चित्रपट निर्मात्यांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने कथानिवड, चित्रीकरण, पोस्ट प्रोडक्शन, वितरण, सॅटेलाईट राईट्स, मार्केटिंग सबसिडी, पब्लिसिटी आदी विषयांवर चित्रपट क्षेत्रातील मातब्बर मंडळी यांच्याकडून सखोल चर्चा करण्यात आली. त्यावेळी ‘जाहिरात व प्रसिद्धी आणि सोशल मीडिया याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यामध्ये अनासपुरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, सौमित्र पोटे, नितीन वैद्य, मयूर रानडे यांनी सहभाग घेतला. अनासपुरे म्हणाले की सध्याच्या काळात सामान्य माणसाला मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे परवडत नाही. त्यामुळे कमीत कमी रुपयांत चित्रपट उपलब्ध करून दिला तर त्याची पायरसी आपणाला थांबवता येईल. पहिल्या सत्रात'कथेची निवड ते चित्रीकरणाला सुरवात'या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार,संजय जाधव, गजेंद्र अहिरे, सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कोरडे व कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांनी यात सहभाग घेतला. आदित्य सरपोतदार म्हणाले, चित्रपट निर्मिती करत असताना चांगल्या कथेची निवड करणे फार महत्वाचे आहे. यांनी मालामाल विकली, बिल्लू, वोडका डायरी असे अनेक चित्रपटांचे लेखन केलेल्या प्रसिद्ध लेखिका मनीषा कोरडे यांनी चित्रपट दर्जेदार बनविण्यासाठी चांगली कथा असणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तिस-या सत्रामध्ये आॅस्कर अकॅडमीचे ज्यूरी व सदस्य उज्वल निरगुडकर म्हणाले, मराठी चित्रपट आॅस्करपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. उत्तम निर्मितीबरोबर चित्रपटाचा विषय देखील महत्त्वाचा आहे याकडे लक्ष वेधले. तर शेवटच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, तालुका स्तरावर चित्रपट गृहांची निर्मिती होणे गरजेचे आहे. तर निर्माते वैभव जोशी यांनी चित्रपट निर्मिती करताना आर्थिकदृष्टया विचार करावा असे सांगितले.महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी चित्रपट महामंडळ सदैव पाठीशी उभे राहील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज काझी, सौमित्र पोटे, अमोल परचुरे, संजय ठुबे, मंगेश नगरे यांनी केले.
....तर पायरसी थांबवता येईल : मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:10 PM
सध्याच्या काळात सामान्य माणसाला मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे परवडत नाही. त्यामुळे कमीत कमी रुपयांत चित्रपट उपलब्ध करून दिला पाहिजे .
ठळक मुद्दे चित्रपट निर्मिती करत असताना चांगल्या कथेची निवड करणे फार महत्वाचे. तालुका स्तरावर चित्रपटगृहांची निर्मिती होणे गरजेचे.