पांडुरंग मरगजे - धनकवडी : हा फोटो पाहिल्यावर आपणास रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटाची आठवण येईल किंवा आपण एखाद्या गुहेत शिरल्याचा भास होईल, मात्र तसं काही नाही, हा आहे साधारण ४० वर्षांपूर्वीचा सातारा रस्ता...! आताचे बदललेले रूप पाहून कुणाचा विश्वास बसेल? आता इमारती आणि उड्डाणपुलांमुळे त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. पूर्वी लोकसंख्या कमी असल्याने आणि या भागाचा फारसा विकास झालेला नसल्याने गर्दी तुरळक असायची, पण मोकळ्या हवेत आणि हिरवाईत लोक फिरायला यायचे. आता कोरोनाच्या अघोषित बंदमुळे लोक बाहेर पडेनासे झाले आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्ते आणि सिमेंटची जंगले ते जुने दिवस आठवतायत! सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी म्हणाले, ‘सातारा रस्ता सिटी प्राईडपासून कात्रजपर्यंत अशी दुतर्फा झाडं होती. अशा निसर्गरम्य परिसरामुळे ग्रामीण खेडेगावात असल्यासारखे वाटे. त्यामुळे आम्ही पुण्यातील गर्दीपासून दूर निसर्गरम्य परिसर राहण्यासाठी निवडला, मात्र आता फक्त सिमेंटचे रस्ते उरलेत. धनकवडीमधील आठवण सांगताना आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप म्हणाले, की धनकवडीला सुरुवातीच्या काळात पाण्याची फारच टंचाई होती. धनकवडीमध्ये मोडक व आहेर यांच्या दोनच विहिरी होत्या. केवळ त्याद्वारे पाणी मिळायचे.
............‘पानशेत’नंतरची धनकवडी‘धनकवडी गावच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्वारगेट व ऐतिहासिक कात्रजपासून अगदीच काही अंतरावर वसलेले गाव आहे. परिसराचा विकास होत गेला तसं धनकवडीचं रुप बदलत गेले.
...............................
१९६१ मध्ये पानशेत धरण फुटल्यावर पुण्याच्या मध्यवस्तीतील अनेक नागरिकांनी उपनगरांचा आसरा घेतला. त्यामुळे स्वारगेटपासून दक्षिणेकडील बाजूला लोकवस्ती वाढत गेली. कलाकारांसाठी उभारलेले कलानगर या गर्दीत हरवून गेले आहे,’ असे साहित्यिक डॉ. माधव पोतदार म्हणाले. आता कोरोनाच्या दहशतीने पुन्हा एकदा तीच जुनी शांतता व तुरळक गर्दी अनुभवयाला मिळत असल्याची या परिसरातील जुन्याजाणत्यांची भावना आहे.