पुणे : खडकवासला धरणातून निघालेला कालवा हडपसरपर्यंत पाटबंधारे, महापालिका तसेच पोलीस या तीन खात्यांमधील समन्वयाअभावी धोकादायक झाला आहे. मध्यंतरीच्या कालवाफुटीमुळे पाटबंधारे विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली असून अजूनही तो अनेक ठिकाणी अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज आहे. याशिवाय कालवा दुरुस्तीच्या कामातही नियमितता नसल्यामुळे किमान १५ ठिकाणी तो पडण्याच्या अवस्थेत आहे.
वारंवार मागणी करूनही महापालिकेकडून कर्मचारी व पोलिसांकडून बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे अतिक्रमणे काढता येत नाहीत. महापालिका कोट्यवधी रुपयांची थकबाकी देत नाही. त्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी म्हणून स्वतंत्र तरतूदच पाटबंधारे खात्याकडून केली जात नाही. कालव्याला अगदी लागून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. अतिक्रमण करून राहणाऱ्यांकडून कालव्याची कायम पडझड होत असते. खड्डे पाडणे, माती उचलणे, यातून भराव खचतो. यात सांडपाणी सोडले जाते. ते जमिनीत मुरते व भराव खचतो. भिंत धोकादायक होते.
जनता वसाहत, स्वारगेट, ससाणेनगर, शिंदे वस्ती, बी.टी. कवडे रोड, हडपसर अशा जवळपास १५ ठिकाणी कालवा धोकादायक झाला आहे. तेथील भिंतींची दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच अस्तरीकरण करणेही गरजेचे झाले आहे. कालवा दुरुस्तीकडे तसेच अतिक्रमणे काढण्याकडे पाटबंधारे खात्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. कालव्याची मालकी त्यांच्याकडे असल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. ते केले जात नसल्यामुळे कालव्याच्या अगदी कडेने जनता वसाहतीसारख्या वसाहती उभ्या राहात आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
पाटबंधारे खाते महापालिकेकडे अतिक्रमणे काढण्यासाठी त्यांच्या विभागाचे कर्मचारी मागतात. ते त्यांना मिळत नाही. अतिक्रमणे काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी उत्सुक नसतात. त्यांना पोलीस बंदोबस्त हवा असतो. वारंवार मागणी करूनही तो मिळत नाही. पाटबंधारे खात्याकडे यासाठी लागणारे मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन सारखी यंत्रसामग्री नाही. त्यामुळे महापालिका व पोलीस यांना पत्र पाठवले की ते निवांत होतात.
जबाबदारी महापालिकेचीहीकालवा दुरुस्तीसाठी आमच्याकडे अडचणी असतात. तरीही आम्ही ती करत असतो. कालवा फुटीनंतर पाहणी करताना १५ ठिकाणे धोकादायक आढळली. पाणी सोडलेले असल्यामुळे त्याची दुरुस्ती करणे अवघड होते, मात्र तात्पुरती दुरुस्ती केली आहे. आता काही धोका नाही. महापालिका हद्दीतील कालव्यावर अतिक्रमण होऊ न देणे ही महापालिकेचीही जबाबदारी आहे.- पांडुरंग शेलार, अधीक्षक अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभागसंरक्षणाची जबाबदारी त्यांचीचकालव्याची मालकी पाटबंधारे विभागाची आहे. त्यामुळे त्याचे संरक्षणही त्यांनीच करणे अपेक्षित आहे. महापालिकेची शहरात अतिक्रमण कारवाई सुरू असते. त्यातून नियोजन करून पाटबंधारे विभागाला वेळ देणे शक्य आहे, मात्र त्यासाठी त्यांनी महापालिकेबरोबर समन्वय ठेवणे गरजेचे आहे.- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा
संयुक्त बैठक व्हावीपाटबंधारे खाते व महापालिका यांच्यात पाणी मोजण्यावरून, दर आकारणीवरून तसेच कालवा दुरुस्तीवरूनही वाद आहेत. पुणेकरांसाठी म्हणून त्यांनी संयुक्त बैठक घेऊन एकदाच हे सर्व वाद मोडीत काढावेत व पुणेकरांना पाण्याच्या वादापासून मुक्त करावे अशी मागणी आता होत आहे.