पुणे: आणीबाणी विरोधकांना सरकारने सुरू केलेले दरमहाचे मानधन बंद करण्याची मागणी काँग्रेसचेनितीन राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केल्याने या काळात तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले होते. आणीबाणीच्या विरोधात तत्कालीन जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी काम केले होते. आणीबाणीनंतर काही वर्षांनी जनता पक्षातून फूटून त्याच जनसंघीयांनी भारतीय जनता पाटीर्ची स्थापन केली. ते बहुतेकजण आता वृद्ध झाले आहेत. त्याची सरकारी पैशाने सोय लावण्यासाठी म्हणून तत्कालीन सरकारने हे मानधन सुरू केले असल्याचे मत व्यक्त करून राऊत यांनी मानधन बंद करावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तुरूंगात गेलेले हयात असतील तर त्यांना १० हजार व हयात नसतील तर त्यांच्या पत्नीला ५ हजार याप्रमाणे हे मानधन दिले जाते. बिहार तसेच उत्तरप्रदेश सरकारनेही असे मानधन सुरू केले असून केंद्र सरकारकडून त्यात वाढ व्हावी असा प्रयत्न सुरू असतानाच मंत्री राऊत यांच्याकडून ते बंद करण्याची मागणी झाल्यामुळे आणीबाणी विरोधक संतापले आहेत.पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांनी याबाबत शुक्रवारी थेट राऊत यांनाच मोबाईलवर संपर्क करून आपला रोष व्यक्त केला. एकबोटे म्हणाले, राऊत राजकारणात असूनही त्यांना आणीबाणीची काहीच माहिती नाही. देशात आणीबाणीला पहिला विरोध पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध झाला. त्यात जनसंघाचे लोक होते. त्यांच्यासमवेत अनेक पुरोगामी लोकही तुरूंगात गेले. देशात सर्वत्र हाच प्रकार होता. आता ते सर्वच कार्यकर्ते राजकारणातून निवृत्त झाले असून वृद्ध झाले आहेत. त्यांची कौटुंबिक आर्थिक अवस्था चांगली नाही. त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्याच भावनेतून फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले आहे.त्याला अजून वर्षही झाले नाही तोच सत्ताबदल झाला व आता राऊत लगेचच मानधन बंद करण्याची मागणी का करत आहेत तेच कळत नाही. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगेचच पंतप्रधानपद स्विकारलेल्या राजीव गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात देशवासियांची माफी मागितली होती हे तरी राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे होते असे मत एकबोटे यांनी व्यक्त केले. राऊत काय म्हणाले त्याची माहिती देताना एकबोटे म्हणाले, मी त्यांच्याकडे माझा संताप व्यक्त केला आहे. पत्र दिल्याचे त्यांनी मान्य केले. मी पत्र मागे घ्या अशी मागणी केल्यानंतर त्यांनी याविषयाची अधिक माहिती घेऊन विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.
आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 10:55 PM
तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस सरकारने हे केले होते मानधन सुरू