लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : जिल्ह्यातील गॅस वितरकांकडून वाहतुकीच्या नावाखाली घेण्यात येणारे दर व होणारी ग्र्राहकांची पिळवणूक यावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे २१ नोव्हेंबर २००८ रोजी अमलात आणलेले वाहतुकीचे दरपत्रक जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी रद्द केले आहे़ या निर्णयामुळे गॅसधारक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ तसेच गॅस वितरकांकडून होणारी पिळवणूक थांबली जाईल, अशी माहिती ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी दिली़जिल्ह्यातील गॅस वितरकांनी घरगुती व औद्योगिक वापरातील गॅस सिलिंडर कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राच्या बाहेर वितरीत करण्यासाठी वाहतुकीच्या नावाखाली निश्चित दरापेक्षाही मन मानेल, अशी रक्कम ग्राहकांकडून घेतली जात होती. ग्राहकांचे होणारे शोषण लक्षात घेत ग्राहक पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे मागणी करून गॅस वितरकांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली होती़ याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस वितरणाबाबत पूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही, गॅस एजन्सीची संख्या वाढलेली आहे़ यापुढे वाहतुकीच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीत़ याबाबत सर्व गॅस कंपन्यांना ग्राहक पंचायतीची तक्रार पाठवून निर्णय घेण्यास निर्देश दिले होते़ त्यानुसार तीन प्रमुख कंपन्यांच्या क्षेत्रीय प्रबंधकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकीला उपस्थित राहून गॅस वितरकांकडून होणाऱ्या शोषणाबाबत गंभीर दखल घेतली़ २००८ रोजी जारी केलेले परिपत्रक रद्द करण्याचा आदेश दिला़ या आदेशात पूर्वीपासून कार्यरत असलेले व नव्याने नियुक्त झालेल्या गॅस एजन्सीधारकांकडून अतिरिक्त वाहतूक खर्च वसूल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अपर जिल्हाधिकारी पुणे यांचे दि़ २१/११/२००८ चे अतिरिक्त वाहतूक दर मंजुरीचे परिपत्रक रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे़
गॅस वाहतुकीचे दरपत्रक रद्द
By admin | Published: May 07, 2017 2:20 AM