लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असताना अत्यावश्यक सेवा वगळून, महापालिकेने कोथरूडमधील उद्यानात ८८ लाख रुपये खर्च करून तीन बोलणारी कृत्रिम झाडे बसवण्याची निविदा काढली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना अशी निविदा निघूच कशी शकते, असे आश्चर्य व्यक्त करीत पुण्यातील सामाजिक संस्थांनी ही निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे़
या वर्षीच्या अभूतपूर्व कोरोना संकटामुळे पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या उत्पन्नाच्या ६० टक्केपर्यंतसुध्दा प्रत्यक्ष उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे़ अशा वेळी उपलब्ध निधी पाणीपुरवठा, मलनि:सारण, कचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या अत्यावश्यक विकासकामांसाठी प्राधान्याने खर्च होणे अपेक्षित आहे. तसे आदेशही आपण दिले आहेत. तरीही अशा दिखाऊ व बिनमहत्त्वाच्या कामांसाठी ८८ लाख रुपये खर्चाच्या निविदा निघूच कशा शकतात, असे आश्चर्य वाटत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सजग नागरिक मंच, नागरिक चेतना मंच, सुराज्य संघर्ष समिती, जीवितनादी, सागरमित्र, जलबिराद्री, वसुंधरा स्वच्छता अभियान आदी संघटना व सामाजिक संस्थांनी दिले आहे.
महापालिकेने मात्र या ‘बोलक्या’ झाडांचे जोरदार समर्थन केले आहे. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले, “डहाणूकर उद्यानात जंगलाचे महत्त्व समजावून सांगणारा छोटा कार्यक्रम तयार केला आहे आणि ‘बोलणारी’ झाडे या प्रकल्पाचा फक्त एक भाग आहेत. या ३ झाडांच्या आजूबाजूची सुमारे १०० झाडे अतिशय संयत पद्धतीने हळुवार प्रकाशित केली जाणार आहेत. यातून जंगलातले विविध ऋतू आणि त्यांचे सौंदर्य दिसेल. लहान मुलांना समजेल अशा मनोरंजक पद्धतीने ‘बोलकी झाडे’ पर्यावरणाचे महत्त्व सांगणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ८८ लाख रूपये आहे. त्यामुळे फक्त तीन बोलकी झाडे असे त्याकडे न पाहता, पुण्याच्या पर्यटन वैभवात भर घालणारा एक आगळावेगळा उपक्रम म्हणून याकडे पाहावे,” दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितले.
---------------------------