पुणे : सुतार समाज हा हिंदू धर्माच्या सर्व प्रकारच्या परंपरा, चालीरिती , व्रत, पूजा-पाठ नित्यनियमाने करतो. समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. आमचे विचार प्रगत झाले आहेत, त्यामुळे आमचे आरक्षण रद्द करून ब्राम्हण समाजात घ्या, अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू गरूड व संजय भालेराव यांनी केली आहे.
नव्याने जनगणना करून सुतार समाजाला खुल्या प्रवर्गात घ्यावे, अशी मागणी करत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे. तसेच येत्या काळात याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे देखील विष्णू गरूड यांनी सांगितले. ते म्हणाले, की गेल्या ७० वर्षातील आरक्षणाच्या लाभाने सुतार समाजातील बांधवांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. आज प्रत्येक जात समूह आरक्षण मागत आहे. मात्र, आरक्षणाचा लाभ घेणारे राष्ट्रहितासाठी व सामाजिक दायित्वासाठी मागे राहत आहे.
''राज्यात तसेच देशात सुतार समाजाच्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय संस्था, संघटना कार्यरत आहेत. त्या कधीही ‘फुले-शाहु-आंबेडकर’ या महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करत नाहीत. तसेच त्यांचे विचारही समाजात सांगत नाहीत. थोडक्यात म्हणजे सुतार समाज इतका प्रगत झाला आहे, की त्यांना महापुरूषांच्या विचारांची गरजच राहिली नसल्याचे विश्वकर्मा प्रतिष्ठान संस्थापक विष्णू गरूड सांगितले.''
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या प्रमुख मागण्या...
- व्यावसायिक कर्ज २ लाखांपर्यंत विनातारण, जमीनकी द्यावी.- तालुका पातळीवर विश्वकर्मा औद्योगिक भवन उभारावे.- ग्रामीण भागातील सुतार समाजाला घरबांधणीसाठी ५ लाखांचे कर्ज द्यावे.- सामुदायिक विवाह सोहळ्यास अनुदान द्यावे.- आंतरजातीय विवाह केल्यास प्रत्येक जोडप्यास प्रोत्साहनपर ५० हजार रूपये द्यावेत.- सुतार विश्वकर्मीय समाजास रितसर विश्वब्राह्मण म्हणून दर्जा द्यावा.