इंदापूर : तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील पाच दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते इंदापूरमध्ये उपोषण आंदोलने करून आक्रोश व्यक्त करत असतानाच, मंगळवारी (दि. २८) मातोश्री रमाबाई प्राथमिक शाळा, क्रांतिज्योती सावित्रीमाई माध्यमिक विद्यालय, राजमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून बोंबाबोंब आंदोलन केले.
या वेळी आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता. मोर्चा आश्रमशाळा-नेहरू चौक - मुख्य बाजारपेठ - खडकपूरा-पंचायत समिती-पोलीस ठाणे ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणी विविध घोषणा देत झाला. या वेळी रत्नाकर मखरे यांनी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी निवेदन सविस्तर वाचून दाखवले. निवेदनात म्हटले आहे, की समाजाभिमुख काम करणाऱ्या तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली होण्यास अजून एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना, त्यांची बदली होणे अन्यायकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार यांची बदली त्वरित रद्द करावी. या वेळी विद्यार्थी बोंबाबोंब करून घोषणा देत होते, की ‘रद्द करा ! रद्द करा ! तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली रद्द करा!’ आश्रमशाळेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या हस्ते नायब तहसीलदार संजीवन मुंढे व पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी धोत्रे, शिवाजीराव मखरे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर रास्ता रोको मागेतत्पूर्वी मोर्चा काढण्यासाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेऊन देखील मोर्चाला पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यासमोरच अर्धा तास शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला व बोंबाबोंब आंदोलन सुरू केले. पोलिसांचा बंदोबस्त मिळाल्यानंतर रास्ता रोको माघारी घेण्यात आला. खूप लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, पोलीस नाईक नानासाहेब आटोळे यांनी वाहनांना त्वरित वाट करून दिली.