लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमधील अशासकीय सदस्यांच्या निवडीला मुहूर्त लागायला तयार नाही. याच कारणासाठी होणारी समितीची सोमवारची सभा गणपूर्तीअभावी रद्द करावी लागली. समितीमध्ये सदस्यत्व मिळावे यासाठी इच्छुक असलेल्यांना त्यासाठी आता थेट १० आॅगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवड होणार असल्याने महापालिकेत गर्दी केलेल्या अशा इच्छुकांच्या पदरी आज निराशा आली.समितीत सध्या ७ नगरसेवक सदस्य आहेत. त्यांच्यातील फर्जाना शेख यांचे सदस्यत्व न्यायालयीन निर्णयाने रद्द झाले आहे. त्यामुळे सभेसाठी एक नगरसेवक कमी होता. त्यावरून सभा घेतली व अशासकीय सदस्यांची निवड केलीच तर ती बेकायदेशीर ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर सभाच रद्द करण्यात आली. आता ती येत्या १० आॅगस्टला होईल. काही स्वयंसेवी संस्थांचा त्याला विरोध आहे. न्यायालयाने सामाजिक वनीकरण विभागाकडील नोंदणी बंधनकारक केलेली नाही; त्यामुळे सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील ही अट काढून टाकावी, अशी मागणी या संस्थांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयातही दावा दाखल केला असल्याची माहिती मिळाली. विशिष्ट व्यक्तींनाच सदस्य म्हणून घेता यावे, यासाठी ही जास्तीची अट असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.
वृक्ष प्राधिकरणाची सभा गणपूर्तीअभावी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 3:01 AM