विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांना वेगळेच स्थान आहे. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे उचित नाही. इयत्ता दहावीच्या गुणांवर आयटीआय पॉलिटेक्निक आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जातो. परीक्षाच झाल्या नाहीत, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयामुळे निर्माण होणा-या समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असेही शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश पूर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागू शकते. मात्र, प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याऐवजी दहावीची लेखी परीक्षा घेणेच उचित ठरेल, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
-------------------
राज्य शासनाने सध्या केवळ परीक्षा पुढे ढकल्या आहेत. त्या रद्द केल्या नाहीत. त्यामुळे याबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु, सीबीएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे निश्चितच त्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश याबाबत अडचणी येऊ शकतात. या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षांना सामोरे जावे लागू शकते.
- एन. के. जरग, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य
-----------------
राज्य शासन एसएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याबाबत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, सीबीएसई प्रमाणे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. कदाचित दहावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षांच्या पर्यायचा विचार करावा लागेल.
- गंगाधर म्हमाणे, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य