पुणे :पुणे महापालिकेच्या ३६ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या अठरा दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या; पण आरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या अठरा दिवसात रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे.
पुणे महापालिका प्रशासनाकडे घनकचरा व्यवस्थापन कार्यालय अंतर्गत विविध क्षेत्रिय कार्यालयाकडे कार्यरत असलेले आरोग्य निरीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी १८ नोव्हेंबर रोजी काढले होते. प्रभाग रचनेमध्ये मतदार याद्यांची फोड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आरोग्य निरीक्षक बजावीत होते. त्यामुळे या बदल्या रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले.
या अठरा दिवसांमध्ये पुणेकर नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था ही रामभरोसेच होती अशी टीका राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.