उमेदवार ठरला नाही मात्र काॅंग्रेसला प्रचाराची घाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 08:21 PM2019-03-30T20:21:14+5:302019-03-30T20:23:04+5:30
पुण्यात उद्या संध्याकाळी 4.15 वाजता कसबा गणपती मंदिर येथे काॅंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ हाेणार आहे.
पुणे : आज रात्री उशीरापर्यंत उमेदवार जाहीर हाेईल असा अंदाज बांधून पुण्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचाराची तयारी सुरु केली आहे. उद्या संध्याकाळी 4.15 वाजता कसबा गणपती मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ हाेणार आहे. असे असले तरी उमेदवार नेमका काेण असणार हे शनिवार संध्याकाळपर्यंत गुलदस्त्यातच हाेते. त्यामुळे उमेदवाराची अधिकृत घाेषणा व्हायच्या आधीच शहर काॅंग्रेसने प्रचाराची तयारी सुरु केली आहे.
काॅंग्रेसचा पुणे लाेकसभेच्या जागेसाठी काेण उमेदवार असणार याची चर्चा गेला महिन्याभरापासून सुरु आहे. काॅंग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने अनेक विनाेद देखील साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. दुसरीकडे भाजपाने गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करुन प्रचारास सुरुवात देखील केली. काॅंग्रेसचा उमेदवार मात्र ठरता ठरत नाही. सुरुवातीला माेहन जाेशी आणि अरविंद शिंदे यांचे नाव आघाडीवर हाेते. त्यानंतर अरविंद शिंदे यांना उमेदवारी मिळणारच या आशेने त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला देखील सुरुवात केली हाेती. मध्येच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या हाेत्या. प्रवीण गायकवाड यांचे नाव देखील सुरुवातील आघाडीवर हाेते. परंतु नंतर त्यांनी माघार घेतली हाेती. आज त्यांनी मुंबईत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जाेरदार चर्चा सुरु झाली आहे. गायकवाड यांनाच उमेदवारी मिळणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.
दरम्यान दुपारी काॅंग्रसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गायकवाड यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या उमेदवारीची घाेषणा हाेईल असे वाटत हाेते. परंतु दुपारी उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. संध्याकाळी 5 वाजता पुण्याचा उमेदवार जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु रात्री आठ वाजले तरी उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. दुसरीकडे शहर काॅंग्रेसने प्रचाराच्या शुभारंभाची तयारी देखील सुरु केली. परंतु उमेदवाराची अधिकृत घाेषणा न झाल्याने प्रचार नेमका करायचा काेणाचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला हाेता.
असे असले तरी रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी काॅंग्रेसचा पुण्याचा उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.