घोडेगाव : मत मागून थकलेल्या उमेदवारांना आता वाट पाहण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आपल्या झोळीत किती दान पडले, की आपले दान कोणी हिसकून घेतले, या विचाराच्या धाकधुकीने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. लगेचच गुरुवारी (दि. २३) निकाल असल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीत ढवळून निघालेले जिल्ह्यातील गट गण मतदान झाल्यानंतर शांत झाले आहेत. रात्रंदिवस धावपळ करून थकलेले उमेदवार व कार्यकर्ते आता निकालाच्या चिंतेत पडले आहेत. अनेक प्रश्नांनी उमेदवारांची झोप उडून गेली आहे. गुरुवारपर्यंत (दि. २३) उमेदवार, कार्यकते सगळ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कार्यकर्ते मतदानाची आकडेवारी पाहून विविध आडाखे लावू लागले आहेत. या गावात जास्त मतदान आपल्या फायद्याचे, त्या गावातील कमी मतदान विरोधी पार्टीच्या तोट्याचे असे विविध आडाखे लावून कार्यकर्ते अंदाज लावत आहेत. त्यात मतमोजणी लगेचच तिसऱ्या दिवशी असल्याने चर्चेच्या मुद्द्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. आपणच निवडून येऊ, अशा अविर्भावात फिरणाऱ्या उमेदवाराचे मन मात्र चिंतेने पोखरून टाकले आहे. उमेदवारांचा चेहरा त्यांची चिंता स्पष्ट दाखवून देत असतो, मात्र प्रचारात खूप दमलो असल्याचे सांगून उमेदवार वेळ मारून नेतो. आता मतदान झाले असल्याने गावातील कट्ट्या-कट्ट्यांवर गप्पांचे फड रंगू लागले आहेत़
उमेदवारांचा जीव टांगणीला
By admin | Published: February 22, 2017 2:24 AM