पुणे : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) केंद्रात उशीरा आलेल्या परीक्षार्थींना आत प्रवेश देण्यास नकार दिल्याने वादावादी झाली. तेव्हा परीक्षार्थींनी जबरदस्तीने गेट उघडून आत प्रवेश केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा केंद्र आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी केंद्रात प्रवेशासाठी सकाळी साडेसात ते सव्वा नऊ अशी वेळ देण्यात आली होती. याबाबतच्या सूचना हॉल तिकीटावर स्पष्टपणे नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानुसार सव्वा नऊ वाजता तेथील कर्मचार्यांनी गेट बंद केले. त्यानंतर सुमारे ४० परीक्षार्थी उशिरा आले. त्यांनी गेट उघडण्याची मागणी केली. मात्र, कर्मचार्यांनी गेट उघडण्यास नकार दिल्याने त्यांच्या वादावादी झाली. तेव्हा काही जणांनी पुढाकार घेऊन गेट उघडून आत प्रवेश केला. याची माहिती मिळाल्यावर वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परीक्षार्थींनी माफी मागितल्यास त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून कोणतीही तक्रार देणार नसल्याचे परीक्षा आयोजकांनी पोलिसांना सांगितले आहे.