हडपसर : कितीही जनजागृती केली, मतदारांना स्क्रॅचकार्ड वाटले, तरीसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढत नाही. सकाळपासून मतदार सवड मिळेल तेव्हा आपला हक्क बजावून जात होता. कडक बंदोबस्त, सर्व पक्षांचे बूथ, अपक्ष उमेदवार एकाकी उभा, असलेले चित्र आज सर्व मतदान केंद्रांवर पाहण्यास मिळाले. प्रभाग क्र. २१ मध्ये ५५ टक्के एवढे मतदान झाले. प्रभाग क्र. २२ मध्ये ५८.६३ टक्के, प्रभाग क्र. २३ मध्ये ५९.१७ एवढे मतदान झाले चार उमेदवारांचा प्रभाग असल्याने चार भागांतील बूथवर फिरून प्रत्येक उमेदवाराची दमछाक झाली. मतदार याद्या कितीही दुरुस्त केल्या, तरी मतदारांचे हाल झाले. माळवाडी-मुंढवा प्रभागातील २५० ते ३०० मतदार सातववाडी प्रभागात, तर सातववाडी प्रभागातील माळवाडी ४०० ते ४५० मतदार गेल्याच्या तक्रारी मतदार करीत होते. पहिल्या टप्प्यात सकाळी ९.३० वाजता ७ ते १२ टक्के मतदान झाले. दुपारी ११.३० वाजेपर्यंत सुमारे २० टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. रामटेकडी-वैदूवाडी भागात मात्र दुपारी १.३० पर्यंत अवघे ७ टक्के मतदान झाले होते, काही कें द्रांवर ३२ ते ३५ टक्के मतदान १.३० पर्यंत झाले, तर ३.३० वाजता ४० ते ४२ टक्के मतदान झाले, मात्र दुपारनंतर अनेक कंपन्यांनी अर्धी सुटी दिल्यामुळे कामगारवर्गाच्या मतदानाचा टक्का वाढला. कडक उन्हामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहसुद्धा कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची टक्केवारी अपेक्षित झाली नसल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ पूर्णपणे शांत झाली. पोलीस बंदोबस्त कडक असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.(वार्ताहर)उमेदवारांचे चिन्ह शोधताना मतदारांची कसरत मतदान केंद्रावर एकापेक्षा जास्त यंत्र असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. अशिक्षित मतदारांबरोबर साक्षर मतदारांनाही मतदान करताना अडचणी आल्या. एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करण्याची मतदारांची ही पहिलीच वेळ होती. अ, ब, क आणि ड अशा चार उमेदवारांसाठी रंगही वेगवेगळे होते; मात्र उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मतदारांना नाव आणि चिन्ह शोधताना कसरत करावी लागली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर, मतदान प्रक्रिया करता आली. काही केंद्रांवर उमेदवारांच्या माहितीचे फलक नव्हते, केंद्रातील खोल्यात मतदानाची टक्केवारी लिहिण्यासाठी बोर्ड नव्हते. तर, केंद्रावरील अधिकारी व्हॉट्सअॅपवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आकडेवारी पाठवत होते. मात्र, टक्के वारी काढण्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
उमेदवारांची झाली दमछाक
By admin | Published: February 22, 2017 3:09 AM