पुणे : राज्य सेवा पूर्व (mpsc exam) परीक्षा २०२१ करीता सर्वाधिक ठरलेल्या उमेदवारांना १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी येत्या २ जानेवारी २०२२ रोजी होणारी नियोजित पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी दुपारी जाहीर केला. या उमेदवारांना २८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात येत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून (जाहिरात क्रमांक १०६/२०२१) वयोमर्यादा कमाल गणना तत्कालिन शासन नियमांनुसार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने १७ डिसेंबर, २०२१ अन्वये १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत विहीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची एक संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी :-
- २८ डिसेंबर २०२१ रोजी पाच वाजल्यापासून १ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करण्यात येत आहे.
- ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहीत अंतिम १ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत भारतीय स्टेटमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याकरिता विहीत अंतिम २ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम ३ जानेवारी २०२२ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
- वरीलप्रमाणे विहीत पद्धतीने व विहीत कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.