पुणे : केंद्राने राज्यांना आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांची येत्या साेमवार (दि. ९) रोजी पुण्यात राज्यस्तरीत बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांनी सांगितले .
मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना, संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीसमवेत ही बैठक म्हात्रे पूल येथे महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. या बैठकीत आरक्षण संदर्भात केंद्राने १०२ च्या घटना दुरूस्तीबाबत घेतलेेले निर्णय, मराठा समाजासाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा त्याचबरोबर प्रस्तावित असलेल्या योजनांना गती देण्यासाठी तसेच सरकारकडून प्रलंबित असणाऱ्या विषयावर या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे.
अशोक चव्हाणांची मागणी मान्य होणार नाही
मराठा आरक्षणाचा मार्ग अद्याप सुकर झालेला नाही. केंद्राच्या निर्णयाने ओबीसी आरक्षणाचा एक अडथळा दूर होणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्यासाठी घटना दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र या दोन्हीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागणार आहे. अशोक चव्हाणांची ती मागणी लगेच मान्य होणार नाही.
न्यायालयाकडे अर्ज करून निर्णय मागावा लागणार
राज्य सरकारने जी घटना दुरुस्तीची मागणी केली आहे. ती मागणी मान्य जरी झाली असे गृहीत धरले तरी मराठा समाजाला आरक्षण देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत येत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचे प्रतिनिधित्व मोजण्याचे जे सुत्र निश्चित केल्याचे देशभर लागू आहे. ते सुत्र केंद्र आणि राज्याने एकत्रितरित्या न्यायालयाकडे अर्ज करून निर्णय मागावा लागणार आहे.