लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जेईई मेन्स-२०२१ परीक्षेबाबत प्रसिध्द करण्यात आलेले परिपत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अचानक संकेतस्थळावरून काढून टाकले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. देशातल्या लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या संस्थेने त्यावर कोणताही खुलासा जाहीर न करणे अधिक गंभीर असल्याची प्रतिक्रिया शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.
अर्धा डिसेंबर महिना संपला तरीही जेईई मेन्स परीक्षेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोणतीही सूचना प्रसिध्द केली नव्हती. त्यामुळे जेईई परीक्षा होणार की नाही, जानेवारीत होणार की फेब्रुवारी महिन्यात होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता होती. मात्र, एनटीएसतर्फे मंगळवारी (दि. १५) जेईई मेन्स परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याने दिलासा मिळाला. परंतु, हे परिपत्रक संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले आहे.
प्रवेशपूर्व परीक्षांचे अभ्यासक दुर्गेश मंगेशकर म्हणाले की, एनआयटी, ट्रिपल आयटी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे परिपत्रक प्रसिध्द करण्यापूर्वी निश्चितच काळजी घेणे अपेक्षित आहे. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरविण्याचे माध्यम म्हणून काम करणाऱ्या एनटीएसने परीक्षेचे परिपत्रक का काढून टाकले याचा खुलासा अद्याप केलेला नाही. मंगळवारपासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार होते. परंतु, परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणतीही लिंक उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत.
------------------------------