पुणे : आरामदायी प्रवासाठी अनेकजण शहरातंर्गत प्रवासासाठी ओलाउबर कॅबला पसंती देतात. मात्र अंतर कमी आणि त्यातून मिळणारे पैसेही कमी असतील तर अगदी ऐनवेळी ड्रायव्हर कॅब रद्द करतात. कधीकधी हे कॅबचालक स्वतःहून तुम्हाला कॅब रद्द करायला भाग पाडतात. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो.
ग्राहकांना जिथे जायचंय त्या ठिकाणी ड्रायव्हर्सना जायचंच नसेल किंवा त्या मार्गावर खूप गर्दी, ट्राफिक असेल तर कॅबचालक ग्राहकांना बुकिंग रद्द करायला सांगतात. ते स्वतःहून अधिकदा बुकिंग कॅन्सल करू शकत नाहीत, कारण त्यांनी वारंवार बुकिंग रद्द केलं तर कंपनीकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळेच ग्राहकांनी स्वतःहून कॅब कॅन्सल करणं त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं. मग अशा वेळी ते कधीकधी पोहोचायला जाणूनबुजून उशीरही करतात.
काही वेळा कॅब किंवा ऑटो बुक करतो तर ॲपवर गाडीचा नंबर वेगळा आणि समोर आलेल्या ऑटो किंवा कॅबचा नंबर वेगळा असतो. तसेच बऱ्याचदा पेमेंट करताना प्रवासी आणि चालकामध्ये वाद होतात. क्यूआर कोड स्कॅन केला तरीदेखील पेमेंट केवळ प्रोसेसिंगमध्ये असते. पर्यायाने ही रक्कम आपण कॅश माध्यमातून त्यांना देतो. अनेकदा ऑनलाईन पेंमेट पद्धतीचं त्यांच्याकडे उपलब्ध नसते. अशा अनेक अडचणींना प्रवासी सामोरे जाताना दिसतात.
पिकअप लोकेशनवर पोहोचण्यास उशीर झाल्यास चालकाला दंड
ओला, उबरकडे कॅब बुक करूनही एखाद्या चालकाने भाडे नाकारल्यास त्याला ५० ते ७५ रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. ओला, उबर चालक अनेकदा पिकअप - लोकेशनवर पोहोचण्यास उशीर करतात. त्यामुळे प्रवासी कंटाळून भाडे रद्द करतात. परंतु, आता चालकाला १० मिनिटे कंपनीची आणि १० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत. २० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास चालकाला दंड आकारला जाणार आहे.
अनेक वेळा मी बसस्टँडवर जाण्यासाठी कॅब बुक करते, मात्र अनेकदा ते कॅन्सल करतात किंवा फोन करून सांगतात की मॅडम कॅन्सल करा मी दूर आहे जमणार नाही. एकदा तर रात्री उशिरा घरून शहरात परतले माझाकडे कॅश नव्हती आणि तो कॅब ड्रायव्हर माझ्याशी वाद घालू लागला. रात्रीची वेळ होती तरी देखील त्यांनी ऑनलाईन पेमेंट घेतले नाही. - मयुरी चातुर्मासे, प्रवासी