सरस्वती शेंडगे यांचे मत : तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, किरण बेदी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे समाजात स्त्रियांचे वेगळे स्थान निर्माण झाले. चूल-मूल सांभाळत या स्त्रियांनी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचा प्रत्येक महिलेने आदर्श घ्यावा, असे मत उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले.
तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते. यावेळी जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा कसबेकर, संचालिका अॅड. गौरी कुंभोजकर, नगरसेविका अॅड. गायत्री खडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, मृणाली रासने, वैशाली खटावकर, स्वप्नाली पंडित, सुनीता चौहान, दीक्षा माने, विशाखा पवार, चंद्रमा भंडारी, हिना साखरिया, रोहिणी हांडे, स्वाती ओतारी, अभिनेत्री वाळके, मनाली देसाई आदी उपस्थित होते.
महिला व्यावसायिक लता हगवणे, वर्षा ढमाले, रोहिणी इंगळे, डिंपल ठक्कर, वंदना ललवाणी, उज्वला कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. शाल, फळांची परडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.