पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता पुन्हा सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची क्षमता १०० खाटांनी वाढविण्यात आली आहे. यामध्ये व्हेंटिलेटर आयसीयू २० खाटा, व्हेंटिलेटर शिवायच्या ६० आयसीयू खाटा आणि ऑक्सिजनच्या २० खाटांचा समावेश आहे. जम्बो आता पूर्ण क्षमतेने सुरु झाले असून, एकूण बेडसंख्या ७०० वर गेल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
जम्बो रुग्णालयाचे व्यवस्थापन, रचना आणि उपचार यांची नवी दिल्लीच्या लेडी हार्डीग मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. घनश्याम पांगती नवी आणि रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र विभाग, सफरदजंग रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. जुगल किशोर यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे, सहायक आयुक्त आशा राऊत आदी अधिकारी उपस्थित होते. ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडची व्यवस्था येथील कमांड सेंटरमधील माहिती तंत्रज्ञान प्रणाली, जम्बो रुग्णालयाचे एकूण सर्व व्यवस्थापन याबाबतचे सादरीकरण अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) रुबल अग्रवाल यांनी केले.
रुग्णांलयातील सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून डॉ. पांगती व डॉ. किशोर यांनी संवाद साधला. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संपर्क साधत माहिती घेतली. जेवणाचा दर्जा योग्य असलेबाबत खात्री करण्यात आली.
---------------
आयुर्वेदिक २५ हजार बाटल्या
रोगप्रतिकारशक्ती वाढविणेकरिता आयुहेल्थ या आयुर्वेदिक तत्वयुक्त पाण्याच्या २५ हजार बाटल्या जम्बो कोविड रुग्णालयाला भेट दिल्या. यामध्ये तुळस, सुंठ, दालचिनी, पिंपळी, गुळवेल, अश्वगंधा असे आयुर्वेदिक घटक आहेत.