पुणे : शहरात ९ मार्च, २०२० रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला व या एका महिन्यात म्हणजे २ एप्रिल, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांसाठी डॉ़ नायडू सांसर्गिक रूग्णालयात केवळ १०० खाटा राखीव होत्या़ पण आज एका वर्षानंतर हाच राखीव खाटांचा आकडा ६ हजार ७२२ वर पोहचला आहे़ तरीही आज शहरात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी रूग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र आहे़
शहरात व जिल्ह्यात ३१ मार्च,२०२० रोजी ४८ कोरोनाचे सक्रिय रूग्ण होते़ आज वर्षभरानंतर शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही ३६ हजाराच्या पुढे गेली आहे़ यापैकी सुमारे ३० हजार २४९ कोरोनाबाधित हे होम आयासोलेशनमध्ये म्हणजे घरीच आहेत़
मार्च, २०२१ च्या प्रारंभापासूनच शहरातील रूग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने, पुणे महापालिकेने पुन्हा एकदा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड-१९ च्या रूग्णांसाठी खाटांची उपलब्धता दाखवणाऱ्या संकेतस्थळावर माहिती भरण्यास सुरूवात केली़ त्यातच गेल्या दोन आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज चार ते साडेचार हजाराने वाढण्यास सुरूवात झाली़ परिणामी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शहरातील खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा या केवळ कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढले़ या आदेशामुळे सध्या शहरात ६ हजार ७२२ (७५० कोविड केअर सेंटरमधील खाटा धरून) खाटा या महापािलकेच्या, शासनाच्या व खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांसाठी राखीव आहेत़
डॅशबोर्डवरील माहितीनुसार शहरातील विविध रूग्णालयांत मिळून शुक्रवारी रात्री आठपर्यंत १ हजार ८७८ साध्या खाटांपैकी ५७७ खाटा रिक्त होत्या़ तर आॅक्सिजनसह असलेल्या ३ हजार ९७८ खाटांपैकी केवळ ३०६ खाटा रिक्त होत्या़ तर ३८० आयसीयु खाटांपैकी १० खाटा रिक्त होत्या़ विशेष म्हणजे शहरातील ४८६ व्हेंटिलेटर खाटांपैकी शहरात एकही व्हेंटिलेटर खाट रिक्त नव्हती़
---------------------