पुणे : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते ( वय ९८) यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक ३० जून २०२३ रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील ७ पिढ्यांनी भारतीय लष्करी सेवेत योगदान दिले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. कॅप्टन हंबीरराव स्वतः मराठा लाईट इन्फंट्री तर्फे वयाच्या २० व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. महायुद्धानंतर त्यांची नेमणूक मित्र देशांच्या जपान येथील मुख्यालयात करण्यात आली, तेव्हा त्यांचा जपानी संस्कृती आणि सभ्यतेशी जवळचा संबंध आला, ज्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग झाला.
वडिलांच्या निधनामुळे त्यांना लष्करी सेवेतून लवकर निवृत्त होऊन कौटुंबिक जबाबदारी आणि पणजोबा आणि वडिलांनी पराक्रम करून मिळवलेली नगर जिल्ह्यातील (जंगी इनाम) ८० एकर शेतीकडे वळावे लागले. त्यामध्ये सुद्धा त्यांनी १९५०-६० च्या दशकापासून आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान वापरून आदर्श शेती केली.
त्याच सुमारास कृषीमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील, अर्थमंत्री धनंजयराव गाडगीळ यांनी कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांची देशातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमणूक केली, जी त्यांनी यशस्वीपणे पार पडली आणि आदर्श अशी सहकारी साखर कारखाना चालवण्याची व्यवस्था लावून दिली. या क्षेत्रात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
पाकिस्तान आणि चीनने भारतावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकी शिक्षण देण्यावर दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वेळेस आणि दिवंगत बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री असताना देशाला जाणीव झाली. त्यावेळेस महाराष्ट्र मध्ये सातारा येथे "सैनिक स्कूल" स्थापन करण्यामध्ये आणि त्याची आदर्श अशी रूपरेषा आखण्यात कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी सरकारला महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यामुळेच आज लष्करामध्ये सातारा येथील सैनिक स्कूल मधील विद्यार्थी महत्त्वाच्या अधिकारी पदावर भारतीय सैन्यामध्ये रुजू आहेत.
त्याव्यतिरिक्त कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा अशा संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करून सहकार्य क्षेत्र, तसेच शेतकी व्यवसायामध्ये आर्थिक व्यवस्थापनावर भर देऊन उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे धाकटे सुपुत्र अमेरिकेवरून येणार असल्यामुळे कॅप्टन हंबीरराव बाजी-मोहिते यांचा अंत्यविधी रविवारी २ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ पुणे येथे होणार आहे.