इंदापूर : कारचा टायर फुटून ती पलटी होऊन रस्ते दुभाजकावर जाऊन आदळल्यामुळे कारमधील 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर कारची धडक बसून दुचाकीस्वाराचा उजवा पाय तुटला. आज (दि.२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी नं.१ जवळ ही घटना घडली.श्रेया दीपराज धुळप (वय १३ वर्षे, रा.अलिबाग, जि.रायगड) असे अपघातात मृत मुलीचे नाव आहे. मोहन भानुदास गायकवाड ( रा. भोसरी, पुणे) असे पाय तुटलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राकेश शंकर नाईक (वय ३४ वर्षे, रा.चौल, ता.अलिबाग, जि. रायगड) यांनी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे.पोलीसांनी सांगितले की, खबर देणारे नाईक हे आपला भाऊ संकेत सुधाकर घरत, दीपराज धुळप, दिशा धुळप, श्रेया दीपराज धुळप हे कार (एमएच-०६-३५८१) मधून देवदर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी नं.१ जवळ कारचा टायर फुटल्याने ती पलटी होऊन रस्तेदुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे कारमधील श्रेया धुळप गंभीर जखमी झाली. त्याच वेळी दुचाकीवरून (एमएच-१४-बीयू-९१६४) सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कारची ठोस बसून त्याचा उजवा पाय तुटला.अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर, गफूरभाई सय्यद, पत्रकार नारायण ढावरे, सुरेश मिसाळ, सागर गानबोटे, अॅड. सतीश देशपांडे, नितीन खिलारे यांनी अपघातग्रस्तांची भेट दिली. त्यांना मदत करत दिलासा दिला. उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, विश्वनाथ पाटोळे, सचिन भिसे यांनी सर्व परिस्थिती तत्परतेने हाताळली.
इंदापूरमध्ये टायर फुटून कार पलटी, अपघातात मुलगी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 10:25 PM