लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एक चारचाकी गाडीचा बिघाड होऊन चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दगडधोंड्यांवर आपटत दीडशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने खेड पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे चालक बचावला आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) मध्यरात्री घडली.
संजय मधुकर खैरनार (वय ४९, रा. नाशिकरोड, नाशिक) नाशिकवरून पुण्यात नातेवाइकांकडे जात होते. पुणे - नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात आल्यानंतर अचानक वाहनात बिघाड झाला. घाटात गाडी थांबवून खैरनार यांनी गाडीची पाहणी केली. पुन्हा गाडी सुरू केली असता अचानक गाडीचा वेग वाढला व गाडी थेट १५० फूट दरीत गेली. दरम्यान, एका व्यक्तीने खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस अंमलदार स्वप्निल गाढवे, संतोष घोलप, शेखर भोईर, अर्जुन गोडसे, होमगार्ड लोखंडे, बाळा भांबुरे तात्काळ घटनास्थळी येऊन दरीत उतरून चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीत असणारे खैरनार यांना बाहेर काढले. खैरनार मागच्या व पुढच्या सीटमध्ये अडकलेले होते. ते जवळपास बेशुद्ध होते; पण कुठलीही मोठी जखम, रक्तस्राव दिसत नव्हता. सर्वांनी मिळून उचलून त्यांना वर रस्त्यावर आणले आणि रुग्णवाहिकेतून लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ठीक असून, गंभीर जखमी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, अशी भावना यावेळी मदत करणाऱ्यांनी व्यक्त केली. घाटातील बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नाही. खैरनार याची गाडी दरीत कोसळली. झाडेझुडपांत गाडी अडकल्याने व पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेल्यामुळे चालक खैरनार यांचा जीव वाचला आहे.