राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एक चारचाकी गाडीचा बिघाड होऊन चालकाचा ताबा सुटल्यामुळे सुमारे १५० फुट दरीत कोसळली. सुदैवाने खेडपोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे चालक बचावला आहे. (संजय मधुकर खैरनार, वय ४९ रा. नाशिकरोड नाशिक) असं चालकाचं नाव आहे. ही घटना १४ तारखेला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
खैरनार हे नाशिकवरून पुण्याला नातेवाईकाकडे जात होते. पुणे -नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात आल्यानंतर अचानक चारचाकी कारचा बिघाड झाला. घाटात गाडी थांबवून खैरनार यांनी गाडीची पाहणी केली. पुन्हा गाडी सुरू केली असता अचानक गाडीचा वेग वाढला व गाडी थेट १५० फुट दरीत गेली. दरम्यान एका व्यक्तीने खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस अंमलदार स्वप्नील गाढवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत उतरुन चारचाकी गाडीच्या काचा फोडून जखमी अवस्थेत असणाऱ्या खैरनार यांना बाहेर काढले. खेड घाटातील बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नाही. खैरनार याची गाडी दरीत कोसळली झाडे झुडपांत गाडी अडकल्याने व पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेल्यामुळे चालक खैरनार यांचा जीव वाचला आहे.