शिरूर: बाह्यवळण मार्गावर सतरा कमानी पुलाजवळ कंटेनरला मागील बाजूने कार धडकून झालेल्या अपघातात कारमाधील चौघे ठार झाले. यात दोन सख्खे भाऊ, त्यांची आई अशा मायलेकरांचा व वीस दिवसांच्या नवजात बालकाचा समावेश आहे. या बालकाची आई गंभीर जखमी झाली आहेेे.
किशोर माधव हाके (वय ३२ वर्षे ), लिंबाजी उर्फ़ शुभम माधव हाके ( वय २५ वर्षे ),विमलबाई माधव हाके ( वय ६० वर्षे ), नवजात बालक ( २० दिवस ) सर्व रा. सध्या रायसोनि कॉलेजचे पाठीमागे मातोश्री बिल्डिंग वाघोली पुणे. मुळ रा. रामतिर्थ ता. लोहा जि. नांदेड अशी मृतांची नांवे आहेत. नवजात बालकाची आई पुष्पा हाके या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त स्थळाजवळ असणाऱ्या एका चहाच्या स्टॉलवरील रमेश पांडुरंग चौधरी या व्यक्तीने अपघाताची पाेलिसांना माहिती दिली.
आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. दुभाजकाच्या बाजूला एक कंटेनर डिझेल संपल्याने जागेवर उभा होता. पहाटे चारच्या दरम्यान औरंगाबादहून पुणे बाजुला जाणारी वॅगनर कार ( क्र. एमएच -१२ क्यूडब्ल्यू ८५०२ ) कंटेनरला ( क्र. आर जे 05 जी बी 2433 ) मागील बाजूने धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारचा चेंदामेंदा झाला. यात चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर , पोलिस कर्मचारी जनार्दन शेळके , रवींद्र पाटमास , क्रुष्णा व्यवहारे , हेमंत शिंदे , संजय जाधव , गजानन जाधव , सुरेश नागलोथ , अभिषेक ओव्हाळ यांच्यासह अपघात स्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले व गंभीर जखमी पुष्पा हाके यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. किशोर हाके हा दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करायचा. मात्र अलिकडे त्याने स्वतःची दोन वाहने घेऊन टुरीस्टचा व्यवसाय करीत होता. हाके यांनी दहा ते बारा दिवसापूर्वी आपली पत्नी पुष्पा यांना बालकासह त्यांच्या माहेरी, औरंगाबाद येथे सोडले होते. काल संध्याकाळी किशोर हे आपली आई, भाऊ व भाची यांना घेऊन पत्नीला आणण्यासाठी औरंगाबादला गेले होते. बाळ पाठवताना तिथे एक छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला. हा आनंदमय कार्यक्रम आटोपून किशोर हाके रात्री एकच्या सुमारास पत्नी व बाळाला घेऊन वाघोलीच्या दिशेने निघाले. त्यांची कार सतरा कमानीचा पूल ओलांडून पुढे शिरूर बाह्यवळण मार्गावर आली असता उभ्या कंटेनरला धडकली. यात मायलेकरांसह बाळालाही प्राण गमवावे लागले.