भोर (पुणे) :भोर - महाड रस्त्यावरील वारवंड गावच्या हद्दीत कोकणाकडे जाणारी कार २०० फुट खोल निरा देवघर धरणात पडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता घडला असून मृतांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे.
कारचालक अक्षय रमेश धाडे (वय २७ रावेत), स्वप्नील शिंदे (वय २८ पुणे), हरप्रीत(वय २८ पुर्ण नाव माहित नाही, रा- पुणे) अशी मृतांची नावे असून यातील स्वप्नील शिंदे याचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. संकेत विरेश जोशी (वय २६ बाणेर) हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी चौघेजण कोकणात पर्यटनाला जााण्यासाठी कार (क्र. एमएच १२ एच डी ३९८४) मधून निघाले होते. भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातून जात असताना वारवंड गावच्या हद्दीत एका वळणावर आल्यावर समोरुन आलेल्या गाडीला साईट देण्याच्या प्रयत्नात अक्षय धाडे याचा कारवील ताबा सुटला. कार १५० ते २०० फुट खोल निरा देवधर धरणात पडली. धाडेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी संकेत जोशी हा डोंगरातून रस्त्यावर आल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले.
शिरगाव येथील निलेश पोळ यांनी अपघाताची माहिती शासकीय यंत्रणांना दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर पोलीस उध्दव गायकवाड, दत्ताञय खेंगरे, विकास लगस तलाटी विकास कारळे, वारवंड पोलीस पाटील सुधीर दिघे, भाऊ उंब्राटकर भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन भोर, सहयाद्री रेस्क्यु फोर्स व स्थानिक हिर्डोशी, वारवंड व शिरगाव येथील ग्रामस्थानी गाडीतून मृतदेह बाहेर काढून रस्त्यावर आणण्यासाठी मदत केली. जखमीवर हिर्डोशी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
.... पर्यटकांवर दंडात्मक कारवाई
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरंध घाट पर्यटकांसाठी निगुडघर येथे बॅरिकेट लावून बंद करण्यात आला होता. मात्र तरीही काही पर्यटक या सूचनेकडे लक्ष न देता याच मार्गाचा वापर करत होते. शनिवारी घडलेल्या अपघातानंतर या घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार असून वेळ पडल्यास या मार्गाचा वापर करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.