पुणे : कोंढव्यातील कौसरबाग परिसरातील चारचाकी गाड्यांचे गॅरेज, भंगाराचे गोदाम यांना मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात तीन गोदामातील माल जळून खाक झाला. आगीमध्ये दोन गॅरेजमधील ८ ते १० मोटारी जळून गेल्या तर, फिश टँकसाठी लागणाऱ्या काचेच्या महागड्या वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कोंढवा येथील कौसरबागेजवळ असलेल्या वेलकम हॉल चौकामध्ये कार गॅरंज, फिश टँकसाठी लागणारे काचेचे वस्तू व भंगाराचे अशी तीन गोदामे आहेत. ही तिन्ही गोदामे एकमेकांना लागून आहेत. बुधवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास या गोदामांना आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर कोंढवा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे स्वरुप लक्षात घेऊन एकूण ८ अग्निशामक दलाच्या गाड्या ३ पाण्याचे बंब, ३ देवदूत बंब घटनास्थळी पोहचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. तोपर्यंत या तीनही गोदामातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या.