मांडवगण फराटा : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे शाळेत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. जगतापवाडी येथे काल सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अनुष्का गणेश जगताप ( वय १३ ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. गणेश जगताप (रा. शिरसगाव काटा) यांनी मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्रात याबाबत खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापवाडी येथील अनुष्का ही पिंपळसुटी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती. सकाळी नऊच्या सुमारास वडील तिला शाळेत जाण्यासाठी जगतापवाडी येथील एस.टी. थांब्यावर सोडून परत घरी गेले होते. यावेळी इनामगावकडून न्हावरे बाजूकडे जाणाऱ्या कारने (एमएच १२ जेएम ८३०६) तिला जोराची धडक दिली. अमर कदम यांनी याबाबत तिचे वडील गणेश यांना फोन करून माहिती दिली. दरम्यान, दत्तात्रेय जगताप, महेश घाडगे व चालक नंदकुमार संपत नलगे यांच्यासह मुलीच्या वडिलांनी अनुष्का हिला त्याच गाडीत घेऊन न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मांडवगण फराटा पोलिसांनी नंदकुमार संपत नलगे (रा. इनामगाव, ता. शिरूर) या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गवळी तपास करीत आहेत.