अवसरी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात अपघाताची मालिका कायमच सुरू आहे. चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. परिणामी रस्त्यालगतच्या दुकानदारांसह पादचाऱ्यांनी अपघाताची भीती व्यक्त केली.
शुक्रवार (दि.०४) रोजी दुपारी बारा एक वाजण्याच्या सुमारास शिरूर वरून वैदवाडी फाटा मार्गे मंचर वरून भीमाशंकरला जाणाऱ्या कार चालकाने पारगाव वैदवाडी फाटा मार्गे लोणीला जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. तर दुसरा किरकोळ जखमी झाला.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.
पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात कायमच अपघात घडताना दिसून येत आहे. सदर चौक व परिसर नेहमीच वर्दळीचा असतो. या चौकात मंचर शिरूर व पारगाव कारखाना लोणी या चारही गावाकडून येणारे रस्ते जोडले जातात. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यात आता चारही बाजून येणाऱ्या रस्त्यांची कामे झाली आहेत तर काही अंतिम टप्प्यात आहेत. रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. काही क्षणातच हा चौक वाहनचालक पार करताना दिसतात. डांबरीकरण नुकतेच झाले आहे यादरम्यान काही दुचाकीस्वारांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात झाले आहेत. यापूर्वीही या रस्त्यावरून अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काही नागरिकांना प्राणही गमावले लागले आहे. या चारही बाजूंनी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या वृद्धांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे सार्वजानक बाधकाम विभागाने नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. वैदवाडी चौकात आबालवृद्धांची रस्ता ओलांडताना तारांबळ उडते. दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता, या चौकात महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासनाने गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.